पुणे : ‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या फर्ग्युसन महाविद्यालय, महात्मा गांधी रस्ता आणि नॉर्थ मेन रस्त्यावर रात्री नऊनंतर वाहनांना बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे श्रीकांत पाठक उपस्थित होते. राज्य शासनाने पार्ट्यांसाठी पहाटे पाचपर्यंत मुभा दिल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाहतूक आणि विशेष शाखेकडून नियोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला फर्ग्युसन रस्ता, लष्कर परिसर, कोरेगाव पार्क भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. ही कोडी टाळण्यासाठी रात्री नऊनंतर टप्प्या टप्प्याने वाहनांना वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यासोबच मुळशी परिसरात सर्वाधिक पार्ट्या होत असल्यामुळे चॉँदणी चौक, मुंबई -बंगलोर महामार्गावरही बंदोबस्त आणि नाकाबंदी लावण्यात येणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री कारवाई करण्यात आलेल्या ३८७ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या वर्षी त्यांच्यापैकी कोणी मद्य पिल्याचे आढळल्यास त्यांचे ड्रायव्हींग लायसेन्स रद्द केले जाणार आहे.या वर्षी १ डिसेंबरपासून केलेल्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवायांमध्ये १२१५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वर्षभरात ४ हजार ८२३ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले. शहरात २८ ठिकाणी नाकाबंदीमद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. विशेष शाखेकडून चॉँदणी चौकासह शहरातील तब्बल २८ ठिकाणी नाकाबंदी लावली जाणार आहे. याठिकाणी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाया केल्या जातील. या कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. तर, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी चारही परिमंडलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. महिलांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर हे पथक तातडीने मदतीसाठी धावणार आहे. परिमंडल एकसाठी सुषमा चव्हाण, दोनसाठी प्रतिमा जोशी, तीनसाठी वर्षाराणी पाटील यांची पथके असणार आहेत. बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमकशहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी ‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री रस्त्यावर असतील. त्यांच्या मदतीसाठी मुख्यालयाकडील ८०० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक देण्यात येणार आहे. यासोबतच बॉम्बशोधक व नाशक पथक, तसेच श्वान पथकाकडून संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताचा आनंद जरूर लुटावा. परंतु अन्य कोणाला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दारू पिऊन वाहन चालवणे, रस्त्यावर गोंधळ, हुल्लडबाजी करू नये. मोठ्या आवाजात डीजे लावू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. - सुनील रामानंद, सहपोलीस आयुक्त
हुल्लडबाजांना खावी लागणार कोठडीची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 03:20 IST