पिंपरी : वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येत असल्याने, महिलांनी निगडीतील कार्तिक स्वामींच्या मंदिरात रविवारी रात्रीपासून गर्दी केली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे वीस हजार महिलांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला. निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गालगत भक्ती-शक्ती चौकात श्रीकृष्ण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून, दर वर्षी कार्तिक पौर्णिमेलाच महिला भक्तांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जातो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमादेखील म्हणतात. त्यानुसार सोमवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त ट्रस्टतर्फे कार्तिक स्वामींचा महाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचेदेखील वाटप करण्यात आले. ट्रस्टतर्फे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री साडेअकरापासून मंदिर खुले करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी रात्रीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचागानुसार सोमवारी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा मुहूर्त सायंकाळी साडेचार ते साडेसात असला, तरी भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. महिलांना याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेता असल्याने, महिलांनी स्वामींना प्रिय असणारे मोरपंख वाहून दर्शन घेतले. या वेळी स्वामींच्या भजनाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले असल्याची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक संजय संचेती व अध्यक्ष हरिदास नायर यांनी दिली. (प्रतिनिधी)
कार्तिकस्वामी दर्शनासाठी रांग
By admin | Updated: November 15, 2016 02:52 IST