मनोहर बोडखे,दौंडदौंड शहरासह तालुक्यातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा होणारा उपद्रव हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याकामी नगर परिषद, ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. मोकाट जनावरांमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. दौंड शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट जनावरे अस्ताव्यस्त वावरत असतात, तर काही ठिकाणी ही जनावरे भर रस्त्यावर झोपलेली असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतुकीची कोंडी होत असते. मुळात शहरातील रस्ते अरुंद यामुळे वाहतुकीची कोंडी होतीच. त्यातच अस्ताव्यस्त असलेल्या जनावरांचा उपद्रव होत असतो. बऱ्याचदा ही जनावरे रस्त्यावर पळत सुटतात. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांत भीती निर्माण होते आणि नागरिकांनादेखील पळ काढावा लागतो. गेल्या आठवड्यात येथील जुन्या तहसील कचेरीजवळ जनावरांची झुंज सुरू झाली. या झुंजीत मात्र एक महिलेला आणि वयोवृद्ध व्यक्तीला जनावरांच्या धडकेत जखमी व्हावे लागले. जनावरे कचराकुंडीतील कचराही विस्कटतात, परिणामी हा कचरा रस्त्यावर येतो. नगर परिषदेकडे सध्याच्या परिस्थितीत कोंडवाडा अस्तिवात नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न अद्याप ऐरणीवर आहे. यासंदर्भात नगर परिषदेने योग्य ते पाऊल उचलावे, अशीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातदेखील हाच प्रश्न भेडसावत आहे. त्यातच मोकाट कुत्र्यांचादेखील उपद्रव वाढलेला आहे. ही कुत्रे सर्रासपणे दुचाकीचालकांच्या, तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. यात काही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची वस्तुस्थिती आहे. दौंड शहराच्या आजूबाजूला असलेली खेडेगावे, तसेच बारामती आणि पुणे या ठिकाणाहून उपद्रवी कुत्रे दौंड शहरात आणून सोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे.बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला-उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात गुरुवारी (दि.१८) पती-पत्नी उपचारांसाठी आले असता, त्यांचा अडीच वर्षांचा लहान मुलगा कृष्णा हा रुग्णालयाच्या परिसरात उभा होता. या वेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला फरफटत ओढून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थ आणि वडिलांमुळे त्याचे प्राण वाचले. दरम्यान, काही वेळाने याच कुत्र्याने कृष्णावर पाळत ठेवून त्याच्या पायाला चावा घेतला.
मोकाट जनावरांचा प्रश्न अद्याप ऐरणीवर
By admin | Updated: June 18, 2015 22:50 IST