भोर : तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताधारी, प्रस्थापितांना धक्का देऊन मतदारांनी सत्तांतर केले आहे. तर, काही ठिकाणची सत्ता राखण्यात प्रस्थापितांना यश आले. ५० ते ६० टक्के ग्रामपंचायतींत सत्ताबदल झाला आहे.७० पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ५९ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होऊन दीड वाजता सर्व निकाल घोषित केले. आंबाडे, मोहरी खुर्द, भाबवडी ग्रामपंचायतीत निवडणुकीत समान मते मिळाल्याने अनुक्रमे कविता मनोज खोपडे, संगीता कृष्णा बुदगुडे, प्रकाश तुळशीराम देवघरे यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.तालुक्यातील महत्त्वाचे नेते असणारे माजी सरपंच रवींद्र बांदल, शंकर धाडवे, सुभाष धुमाळ, मनोज निगडे, ज्ञानेश्वर पांगारे, धनाजी शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी संचालक दिलीप बाठे, शिवाजी कोंडे, पं.स. सदस्य सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते रघुनाथ किंद्रे या नेत्यांच्या बालवडी, धावडी, वेळू, शिंदेवाडी, शिवरे कांजळे, केळवडे, सारोळे, वेनवडी, महुडे बुदुक, न्हावी ३२२, भोंगवली, जोगवडी कापूरव्होळ, न्हावी १५, नाझर, वर्वे खुर्द, वर्वे बुद्रुक, गोरड म्हशीवली या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी सभापती रणजित शिवतरे, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, बाजार समितीचे सभापती प्रदीप खोपडे, सरपंच रामदास भोंडवे, माजी सभापती आण्णासाो भिकुले, धनाजी शिंदे, सिद्धार्थ टापरे यांच्या हातवे बुद्रुक, उत्रौली, आंबाडे, केंजळ, नसरापूर, किकवी नेरे, शिंद, खोपी, ससेवाडी, टापरेवाडी या ग्रामपंचायती पुन्हा आपल्याकडे राखल्या आहेत. माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी वेळू, राष्ट्रवादीचे नेते संदेश धाडवे यांनी सारोळे व जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी केळवडे, संदीप निगडे भोंगवली या महामार्गावरील मोठ्या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे.
भोरमध्ये प्रस्थापितांना धक्का
By admin | Updated: August 7, 2015 00:43 IST