सासवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तीन पक्ष सर्व ठिकाणी समोरासमोर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना. जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत तर भाजपा व मनसे मात्र सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करू शकले नाहीत. पक्ष, नेते, नातेगोते पाहून मतदान करायचे, की विकासाच्या मुद्याला महत्त्व द्यायचे असे प्रश्न मतदारांसमोर आहेत. तसेच एका पक्षाला बहुमत, की पुन्हा आघाडीचे राजकारण हा प्रश्न आहे. कारण यापूर्वी पंचायत समितीत राष्ट्रवादी व मनसेची आघाडी होती. या वेळी मात्र मनसे एकाच गटात निवडणूक लढवीत आहे . पुरंदरमधील राजकीय नेत्यांनाही त्यांच्या पक्षाने मोठी पदे दिली आहेत. शिवसेनेने राज्यमंत्री पद, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, मनसेचे महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद. या नेत्यांनी आपले पक्षाचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे असून तेथेच त्यांची कसोटी लागणार आहे.यापूर्वी पंचायत समितीत २ जागा व जिल्हा परिषदेत एक जागा काँग्रेसकडे होती. ती टिकवून त्यात वाढ करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे तर राष्ट्रवादीची सत्ता होती ती टिकविण्याचे आव्हान त्यांचेपुढे आहे. शिवसेनेकडे मंत्रिपद आहे. मागील काळात पंचायत समितीत त्यांचा एकच उमेदवार निवडून आला होता. ही संख्या वाढविण्याची जबाबदारी मंत्र्यावर आहे. सासवड व जेजुरी नगरपालिका जिंकल्याने काँग्रेसमध्ये उत्साह आहे तर राष्ट्रवादीचे उमेदवार तगडे आहेत. शिवसेना विकासकामांच्या मदतीने मते मागत आहे.या सर्वांची प्रचाराची रणधुमाळी जाहीर सभा व गाठीभेटीतून सुरू आहे. प्रचारात सर्वच पक्ष आपण किती चांगले आहोत. यापेक्षा दुसरा किती वाईट आहे, याचाच उच्चार करीत आहेत. पुरंदर प्रस्तावित विमानतळ, गुंजवणीचे पाणी, पुरंदर उपसायोजनेचे पाणी, रस्ते असे विषय प्रामुख्याने या निवणुकीत आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने या मुद्याचा वापर करीत आहे.राजकीय नेत्यांची इतर पक्षांच्या नेत्याशी असलेली मैत्री हा कळीचा मुद्दा आहे. एका निवडणुकीत तू मला मदत कर दुसऱ्यात मी तुला करतो, असे प्रकार सुरू आहेत. ही मैत्री आतापर्यंत निभावली गेली आहे; पण आता मात्र आपला उमेदवार पाडून दुसऱ्या पक्षातील मित्राला निवडून आणणे, हे नेत्यांना महागात पडणार आहे. पुन्हा पहिलेच चेहरे मतदारांपुढे आले आहेत. इतर मागासवर्गीयसाठी राखीव पद असले तरी कुणबी दाखले मिळविले गेले, महिला राखीव असेल तर आपल्या पत्नीलाच उभे केले तर महिला राखीव नाही, मग स्वत:च उभे राहिले. पहिल्यांदा स्वत: पाच वर्षे मग महिला राखीव झाल्यावर आपलीच मुलगी व आता पुन्हा आपण स्वत: असे प्रकार झाले आहेत. या घराणेशाहीला मतदार धडा शिकवतात, की पुन्हा निवडून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वार्ताहर)
पुरंदरमध्ये राजकीय नेत्यांबरोबर मतदारांचीही कसोटी
By admin | Updated: February 15, 2017 01:51 IST