पुणे : स्मार्ट पुणे कसं असावं... त्यामध्ये वाहतूक, पाणी, किफायतशीर घरे, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यापैकी कोणत्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर द्यावा... शहर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी आणखी काय करता येईल, हे ठरविण्याची संधी पुणेकरांना लवकरच मिळणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या निकषानुसार शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुणेकरांचा कौल लवकरच जाणून घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी व बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशभरातील १०० शहरांचा समावेश केला जाणार आहे. पहिल्यांदा राज्यपातळीवर आणि त्यानंतर देशपातळीवर स्पर्धात्मक पद्धतीने या १०० शहरांची निवड केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. स्पर्धेचे बहुतांश निकष पुणे शहराकडून पूर्ण होत असल्याने पहिल्या टप्प्यातच पुण्याचा समावेश होण्याची मोठी शक्यता आहे.पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांना राज्य शासनापुढे सादरीकरण करायचे आहे. त्यापूर्वी पुणेकरांना स्मार्ट सिटीबाबत काय वाटते, त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा, याबाबत पुणेकरांची मते जाणून घेतली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस अॅप, व्टिटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा कौल आजमाविण्याचा विचार प्रशासनाकडन करण्यात येत आहे.शहरातील प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये पुणेकरांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे. पर्यावरण, वाहतूक, नदीसुधार अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबतचे धोरण ठरविण्यात प्रशासनाला मदत केली आहे. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पुण्याची ही महत्त्वाची जमेची बाजू असणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून विकेंद्रित पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रियावर करण्यात पुणे आघाडीवर आहे. झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक शौचालय पुणे महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहेत.
स्मार्ट सिटी ठरविण्याची पुणेकरांना संधी
By admin | Updated: July 13, 2015 03:55 IST