पुणे : लखलख चंदेरी तेजाची अनुभूती देणाऱ्या अशाच हिऱ्यांच्या नावीन्यपूर्ण दुनियेची सफर घडविणाऱ्या जडजवाहिरांच्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाला शनिवारपासून सुरुवात झाली. अभिजात आणि उत्कृष्ट कलाकुसरीचे दागिने पुणेकरांच्या पंसतीस उतरत असून, पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्याही (रविवारी) प्रदर्शन संपूर्ण दिवस खुले राहील.प्रख्यात ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा- कोठारी व मुंबईचे प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्निश शेठ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ताज विवांता (ब्लू डायमंड) येथे हे प्रदर्शन सुरू झाले. गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल आणि पूनम गोखले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, नितीन अष्टेकर, अमोल अष्टेकर, चंदूकाका सराफचे सिद्धार्थ शहा, उषा पूनावाला, बाळासाहेब गांजवे, अमित शिरोळे, ज्ञानेश्वर मुंडलिक, उमा ढोले-पाटील, स्मिता जाधव, महालक्ष्मी कन्स्ट्रकशन्सचे दत्तात्रय गोते-पाटील, संतोष रासकर, ईश्वरलाल बंब, सुशीला बंब आदींनी भेट दिली. ‘लोकमत मीडिया लिमिटेड’चे अध्यक्ष विजय दर्डा, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी स्वागत केले. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम हिऱ्यांच्या दागिन्यातून पाहायला मिळत आहे. सर्जनशील आविष्कारातून घडविण्यात आलेली दागिन्यांची कलाकुसर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हिरेजडित कर्णफुले, अंगठ्या, कंठहार, कफलिंंक्स व अद्वितीय असे ब्रायडल सेट येथे पाहायला मिळत आहेत. कफलिंक्स, कुरत्याचे बटण हे हिरेजडित असल्याने पत्नी किंवा मुली यांच्यासोबत येणाऱ्या पुरुषांनाही हे प्रकार आकर्षित करीत होते. त्यातील बारीक हिऱ्यांचे काम, नाजूकपणा आणि त्यातही जपलेला साधेपणा यांमुळे पुरुषांकडूनही अधिक दाद मिळाली. हल्लीच्या तरूणाईला डोळ्यासमोर ठेवून इंडो-वेस्टर्न, पार्टीवेअर, लग्नसराई याबरोबरच्या कपड्यांच्या रंगसंगतीला सूट होतील अशा दागिन्यांची मालिकाच प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. हिरे आणि रूबी यांचा मेळ अप्रतिम आहे. मोठ्या आकारातील, वेगवेगळ्या राशींचे खडे असणाऱ्या,मीनाकाम, रोडियम या सगळ्यांमुळे अंगठ्या विशेष आकर्षक आहेत. त्याचप्रमाणे मोठे सेटसही लक्षवेधी आहेत. (प्रतिनिधी)रत्नजडित दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. पारंपरिकबरोबरच लेटेस्ट फॅशनची आवड लक्षात घेऊन दागिन्यांमध्ये नावीन्यपूर्ण कलाकुसर करण्यात आली आहे. सर्व वयोगटांतील महिलांना आकर्षित करतील, असे दागिने यंदाच्या प्रदर्शनात आहेत. रोजच्या वापराचे, पार्टीमध्ये सहज घालता येतील असे हे दागिने आहेत. दागिन्यांचे हे वेगळेपण लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे हेही वैशिष्ट्य आहे. दागिने बनवितानाही विशेष काळजी घेण्यात आली आहे.- पूर्वा दर्डा-कोठारी, प्रख्यात डिझायनर हिऱ्यांचे दागिने दररोजच्या वापरासाठी नसतात, हा समज या प्रदर्शनातील कलाकुसर पाहून खोटा ठरतो. या दागिन्यांतील अभिजातता आणि कलाकुसर पाहिल्यावर पूर्वाने हिरे डिझायनिंगमध्ये स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे हे दिसते. दागिन्यांच्या कलाकुसरीवर स्वत:चा ठसा उमटविणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु, पूर्वाने ते साध्य केले आहे. - राजीव सेठी, संस्थापक, अध्यक्ष, एशियन हेरीटेज फाऊंडेशन नक्षीकाम उत्तम आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या दागिन्यांपेक्षा वेगळ्या कलाकुसरीचे हे दागिने आहेत. हिऱ्यांचे एक वेगळे आकर्षण, त्यांची केलेली मांडणी आणि नक्षीकाम खूप मोहक आहे. कफलिंक्सवरील बारीक कारागिरी विशेष भावली. - दत्तात्रय धनकवडे, महापौर हिऱ्यांच्या दागिन्यांचे नक्षीकाम अत्यंत रेखीव व दर्जेदार आहे. रूबी, पाचू याच्या मिश्रणातून घडविण्यात आलेले हे दागिने पाहून मन मोहून जाते. हिऱ्याची खरी झळाळी दागिन्यांच्या कोंदणातच पाहायला मिळते. विशेष म्हणजे पुरुषांसाठीही दागिने येथे आहेत, त्यामुळे सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यायला हवी. - दत्तात्रय गोते-पाटील, महालक्ष्मी डेव्हलपर्सप्रदर्शनातील दागिन्यांचे कलेक्शन अप्रतिम आहे. दागिन्यांची डिझाईन खूप नवीन आहेत. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे ही दागिन्यांची मालिका सादर करण्यात आली आहे. त्यामुळे तरुण पिढीला हे दागिने निश्चितच आवडतील. - विशाल गोखले वेगळ्या डिझाईनचे दागिने आहेत. विशेषत: रिंग, बे्रसलेट, कानामागून घालायची ज्वेलरी हे प्रकार खूप आवडले. डायमंड प्रमाणित असल्याने दागिन्यांविषयी खात्री वाटते. हीरा हा प्रकार सगळ्या तऱ्हेच्या कपड्यांच्या रंगसंगतीवर उठून दिसणारा असल्याने त्याविषयीचे आकर्षण मोहवणारे असते. -पूनम गोखले
पुणेकरांनी अनुभवली ‘इंट्रिया’ची झळाळी
By admin | Updated: January 17, 2015 23:34 IST