पुणे : गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणातील साठा तीन टीएमसीने कमी असून, राखीव पाणीसाठय़ाला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौर चंचला कोद्रे यांनी दिले होते. त्यानुसार पुणेकरांना उद्यापासून (सोमवार) एक वेळ पुरेसा पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणक्षेत्रात अंदाजे २६ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत धरणक्षेत्रात २९ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा तीन टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. तरीही काही राजकीय मंडळींनी मतांवर डोळा ठेवून दोन वेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली होती. परंतु, महापालिकेने पाण्याचा राखीव साठा ३0 ऑगस्टपर्यंत ठेवण्याचे पत्र पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा अहवाल प्रशासनाने पक्षनेत्यांपुढे ठेवला होता. अखेर महापौर कोद्रे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून दोन वेळाऐवजी संपूर्ण शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने सोमवारपासून एक वेळ पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे, असे पाणीपुरवठा अधिकार्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुणेकरांना आजपासून एक वेळ पाणी
By admin | Updated: August 18, 2014 05:08 IST