पुणे : एरवी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजून जाणा-या काँग्रेस भवनाला टाळे लावण्यात आले आहेत. भवनाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले असून, विनंती केल्याशिवाय ते खुले केले जात नाही.सततच्या गर्दीने त्रस्त होऊन काँग्रेसच्या विद्यमान पदाधिका-यांनीच भवनाला टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्रास होणारी ही गर्दी कार्यकर्त्यांची नाही, तर वाहनधारकांची आहे. भवनाच्या मैदानात सातत्याने लावली जाणारी चार चारी वाहने ही पदाधिकाºयांसाठी नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. त्यातूनच भवनाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.शहराच्या मध्यवर्ती भागात भलेमोठे मैदान असलेली सार्वजनिक स्वरूपाची ही एकमेव वास्तू आहे. त्यामुळे अनेकजण आपले चारचाकी वाहन निर्धास्तपणे येथे लावून खरेदीला जातात. काहींनी तर ही जागा म्हणजे खासगी पार्किंगच बनवले आहे. अनेकदा रात्रीही त्यांची गाडी मैदानातच पार्क केलेली असते.यावरून मध्यंतरी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कार्यालयीन कर्मचाºयांकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वादावादी झाली. दरवाजा तोडण्यात आला. त्याची गंभीर दखल घेऊन बागवे यांनी आता भवनाचे मुख्य प्रवेशद्वार दिवसा व रात्रीही बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सरचिटणीस रमेश अय्यर यांनी दिली. मात्र, त्याचा त्रास आता कार्यकर्त्यांनाही होत आहे.
पुणे : काँग्रेस भवनाला टाळे! भवनाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:15 AM