पुणे : महापालिकेकडून शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही प्रक्रीया प्रकल्पातून निघणारे इनर्ट वेस्ट आणि काही प्रमाणात मिश्र कचऱ्यावर शास्त्रोत पध्दतीने जिरविण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेकडून राज्यशासनाच्या माध्यमातून वन विभागाकडे मागण्यात आलेली पिंपरी-सांडस येथील जागा दीड महिन्यात मिळण्याची शक्यता असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी मुख्यसभेत सांगितले. त्यामुळे पिंपरी सांडस व परिसरातील गावांना या दुर्गंधीचा समाना करावा लागणार आहे. उरूळी देवाची येथील डेपो मध्ये शहराचा कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दोन महिन्यांपासून विरोध केला आहे. त्यामुळे शहरात कच-याचे ढीग साचले असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासन ही समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांच्या टिकेला आपल्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत प्रशासनाकडून खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आयुक्त कुमार म्हणाले की, ‘‘ शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून गेल्या दोन महिन्यात युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आले तरी, पालिकेस काही कचरा शास्त्रोक्त पध्दतीने जिरविण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने शासनाकडे मोशी आणि पिंपरी-सांडस येथील जागा मागण्यात आली आहे. त्यातील मोशी येथील जागेची फाईल महसूल विभागाकडे आहे. तर वन विभागाकडून पिंपरी-सांडस येथील जागा देण्याबाबत अनुकुल भूमिका घेण्यात आली आहे. त्याचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यास दिड महिन्यात मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पुण्याचा कचरा पिंपरी सांडसलाच टाकणार?
By admin | Updated: February 24, 2015 23:09 IST