पुणे : प्रचारफेऱ्या, मतदारांसमवेतच्या बैठका, वाहनांवरून केला जाणारा प्रचार, कोपरासभा, पोस्टर्स, बॅनर्स..., महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार करीत असलेल्या अशा प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दिमतीला प्रत्येकी ३ अशी चित्रीकरण पथके देण्यात आली असून, त्याशिवाय २४ तास कार्यरत असणारे प्रत्येकी १ पथक सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे असेल. आयोगाच्या आदेशाप्रमाणे सर्व उमेदवारांच्या मालमत्तेचे त्यांनी सादर केलेले विवरण मतदान केंद्रावर फ्लेक्सवर लावले जाणार आहे.निवडणूक शाखेच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. निवडणूक शाखेचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, सहायक अधिकारी संजय मोरे या वेळी उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, ‘‘उमेदवारांना कमीतकमी त्रास व्हावा याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. प्र्रत्येकी ३ प्रभागांसाठी एक याप्रमाणे एकूण १४ निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांच्या मदतीला २ अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या अखत्यारीत एक कक्ष असेल. उमेदवारांंना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांना या कक्षातून मिळतील. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही.’’कोणत्याही प्रचाराची परवानगी किमान ४८ तास आधी मागावी लागेल. अपवादात्मक स्थितीत हा नियम शिथिल करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातले प्रचार साहित्य तपासून घ्यावे लागेल व नंतरच प्रसारित करता येईल. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पेड न्यूजबाबत काही तक्रारी आल्यास त्याची चौकशी करण्यासाठीही अशीच समिती आहे. त्यात प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचा प्रतिनिधी असावा, असा प्रयत्न करण्यात येत आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
प्रचाराचे व्हिडिओ चित्रण
By admin | Updated: January 24, 2017 02:54 IST