लोणी काळभोर : पश्चिम बंगाल येथून आलेल्या परप्रांतीय तरुणीस वेश्याव्यवसायास प्रवृत्त करून त्यांतून पैसे कमावणाऱ्या दलालास पुणे शहराच्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी राजेश रवी शेट्टी (वडकी नाला, मोडक निवास, पुणे-सासवड मार्ग, ता. हवेली) यास अटक करण्यात आली आहे. शेट्टी परप्रांतीय मुलींकडून पुणे-सासवड मार्ग परिसरात वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार वाघचवरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक नीता मिसाळ व पथकास याबाबत शहानिशा करून कारवाई करण्यास सांगितले. त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. एका बोगस ग्राहकाने शेट्टी याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला व चौकशी केली. शेट्टीने दर सांगून एका हॉटेलजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार हा ग्राहक दुपारी हॉटेलजवळ येऊन थांबला. ठरलेल्या वेळी शेट्टी एका २२ वर्षे वयाच्या परप्रांतीय तरुणीस घेऊन तेथे पोहोचला. व्यवहाराचे बोलणे चालू असताना ग्राहकाने ठरल्याप्रमाणे इशारा करताच दलालासह त्या तरुणीस ताब्यात घेण्यात आले. पथकाने तरुणीकडे चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीनुसार पनवेल येथील आपण काम करीत असलेला बीअर बार दीड वर्षापूर्वी बंद झाल्यामुळे उपजीविका करण्यासाठी तिने वेश्याव्यवसाय स्वीकारल्याचे तिने सांगितले. गेल्या चार दिवसांपासून शेट्टीेकडे ती काम करीत होती. तिला मिळणाऱ्या एकूण कमाईतील अर्धी रक्कम शेट्टी घेत होता. (वार्ताहर)
वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणारा दलाल अटकेत
By admin | Updated: September 5, 2015 03:24 IST