पुणे : बनावट नोटा; तसेच काळ्या पैशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेण्यात आलेला विमुद्रीकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे १० टक्के काळा पैसा बाहेर आला, तरी मोठे यश म्हणावे लागेल. सध्या नवीन नोटांचा पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे; मात्र ही गैरसोय जास्त दिवस होत राहिल्यास अडचणीचे ठरू शकते, असे मत रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.गोखले इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्समध्ये आयोजित ‘अर्थशास्त्र महोत्सवात’ त्या बोलत होत्या. ‘आर्थिक धोरण, आर्थिक धोरण समिती आणि केंद्रीय बँकांचे स्वातंत्र्य’ या विषयावर थोरात यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, बनावट नोटांचे वाढते प्रमाण कमी करणे, काळा पैसा चलनात आणणे ही दोन प्रमुख्य उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सोने, जमीन, घर अशा स्थावर मालमत्तेतही काळा पैसा गुंतविण्यात आला आहे. मात्र, हा वेगळा मुद्दा आहे. देशात सुमारे १५ लाख कोटी काळा पैसा असण्याची शक्यता आहे. यापैकी किमान १० टक्के म्हणजे, दीड लाख कोटी पैसा उघड झाला तरी हे खूप मोठे यश असेल. असेही थोरात यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काळा पैसा असलेल्यांकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांकडून बँकेत पैसे जमा केल्यानंतर, त्याची लगेच चौकशी होणार आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईचा खर्च एक हजाराच्या नोटेपेक्षा कमी आहे. तसेच, जास्तीत जास्त लोक ५०० रुपयांच्या नोटांचा चलनात अधिक वापर करतात. त्यामुळे दोन हजार रुपयांचा वापर कमी होणार आहे. हा विचार करून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असावी. नवीन नोटेमुळे बनावट नोटा बनविण्याला मोठा आळा बसेल, असे थोरात यांनी सांगितले.
गैरसोयीचा कालावधी वाढल्यास अडचणीचे
By admin | Updated: November 13, 2016 04:28 IST