पुणे : महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात आलेली केंद्रेही निश्चित केली आहेत. परंतु, या मतदान केंद्र वाटपामध्ये महिला शिक्षिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील ठिकाणे देण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. महिला शिक्षिकांना दहा ते बारा किलोमीटरच्या आतील केंद्र मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. तसे करणे शक्य नसल्यास शिक्षकांना सामंजस्याने केंद्रांची अदलाबदल करू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महिला शिक्षिकांमधून करण्यात येत आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष अणि मतदान अधिकारी नेमण्यात येतात. यावेळी मतदानासाठी चार मशिन्स ठेवण्यात येणार आहेत.मतदान सुरू होण्याच्या साधारण एक ते दीड तास आधी केंद्रावर पोचावे लागते आणि मतदान संपल्यानंतर चार ते पाच तास थांबावे लागते. त्यामुळे भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या शिक्षिकांना रात्री घरी येण्यास खूप उशिर होतो. यावेळी तर कोणाला कोणत्या मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहे, याची माहिती आदल्या दिवशी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आधी जाऊन केंद्र पाहून घेण्याची सोयच राहिली नाही.‘लोकमत’शी संपर्क साधून आपली कैफियत मांडलेली एक शिक्षिका कोथरूड परिसरात राहण्यास आहे. या शिक्षिकेला मांजरी येथील केंद्र आले आहे. हे अंतर जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे. भल्या पहाटे घर सोडलेल्या महिलांना एकटेच केंद्रापर्यंत जावे लागणार आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर माणसे नसतात, अंधार असतो. अशा स्थितीत रस्ता चुकल्यास कोणाला पत्ता विचारणार असा प्रश्न आहे. यासोबतच अनेक शिक्षिकांच्या घरी लहान मुले आहेत. त्याचाही विचार करण्यात आलेला दिसत नाही.
लांबची मतदान केंद्रे मिळाल्याने अडचण
By admin | Updated: February 17, 2017 05:20 IST