पुणे : देशातील प्रत्येक नागरिकाची एकच शासकीय ओळख असावी, यासाठी केंद्र सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन (आधार) नोंदणाी सुरू केली आहे. कारागृहातील कैदी या सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी आधार नोंदणी सुरू करण्यात आली असून, आत्तापर्यंत येथील सुमारे एक हजार कैद्यांची नोेंदणी पूर्ण झाली आहे. आधार कार्ड मिळण्याची संधी सर्वांना उपलब्ध आहे. मात्र, कैदी यातून सुटत होते. आता त्यांच्यासाठी कारागृहातच आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कारागृह व्यवस्थापन, संबंधित पोलीस ठाणे अथवा त्यांच्या नातेवाइकांच्या माध्यमातून कागदपत्रे घेतली जाणार आहेत. ज्या कैद्यांना शिक्षा झाली आहे, त्यांच्या कागदपत्रांची अडचण येत नाही. त्यांची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. ज्यांची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत अशा कैद्यांच्या नोंदणीची अडचण आहे. त्यांच्या नातेवाइकांकडूनच कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अशा कैद्यांची कागदपत्रे नातेवाइकांकडून घेण्याची सूचना राज्याच्या अपर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पोलीस व कारागृह अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीन आधार यंत्राद्वारे नोंदणी सुरू करण्यात आली होती. या विषयी माहिती देताना उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे म्हणाल्या, की येरवडा कारागृहात १२ आॅगस्टपासून आधार नोंदणी सुरू करण्यात आली असून, कैद्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येरवडा तुरुंगात ही योजना सुरू झाल्यानंतर सुमारे एक हजार कैद्यांची आधार कार्डांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. येथे शिक्षा भोगत असलेल्या एक हजार १७२ पैकी ८६१ कैद्यांची नोंदणी झाली आहे. तसेच, २६३ पैकी १८७ महिला कैद्यांना आधार कार्ड देण्यात आले असल्याची माहिती येरवडा तुरुंगाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)
कैद्यांना मिळणार ‘आधार’
By admin | Updated: September 11, 2014 04:21 IST