इंदापूर : शासकीय कामात अडथळा आणून महिला एसटी वाहकास मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून न्हावी (ता. इंदापूर) येथील एक जणास आज (दि. १९) इंदापूर न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड भरली नाही, तर एक महिना साध्या कैदेचीही तरतूद करण्यात आली आहे.अमोल विद्याधर घाडगे (वय २८, रा. न्हावी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. एसटीवाहक पूनम मच्छींद्र मोरे (रा. कळंब, ता. इंदापूर) यांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. पाच वर्षांपासून हा खटला सुरू होता. दि. २ फेब्रुवारी २००९ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मोरे या तिकीट देण्याचे काम करीत असताना ओळखपत्र मागितल्याच्या कारणावरून राग येऊन आरोपी अमोल घाडगे याने फिर्यादीस हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा आणला, असा आरोपीला आरोप ठेवण्यात आला होता. सुनावणी झाल्यानंतर इंदापूरने न्यायाधीश पी. एल. घुले यांनी उपरोक्त शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सरकारी वकील लिंगायत यांनी काम पाहिले. सहाय्यक फौजदार उत्तमराव वाघमोडे, अशोक झगडे यांनी त्यांना सहकार्य केले. (वार्ताहर)
एसटीच्या महिला कर्मचा-यास मारहाण करणा-यास कारावास
By admin | Updated: December 20, 2014 00:07 IST