पुणे : निवडणुकीचा प्रचार करताना पदयात्रांत खूप फिरावे लागणार, हे लक्षात घेऊन अनेक उमेदवारांनी अगोदरपासूनच त्याची तयारी सुरू केली होती़ त्यानुसार दररोज चालण्याचा व्यायाम सुरू केला होता़ निवडणूक प्रचारात दिवसभर गुंतवलेले असतानाही घरच्या डब्याला बहुसंख्य उमेदवार प्राधान्य देताना दिसतात़ त्याबरोबरच मधुमेह, रक्तदाबाचा विकार असणाऱ्या अनेकांनी जेवणाच्या डब्याबरोबरच गोळ्या बाळगत असल्याचे सांगितले़निवडणूक काळात आपले आरोग्य चांगले राहावे, यासाठी उमेदवारांमध्ये जागृती आलेली दिसून येत असून सुरुवातीपासूनच ते त्याबाबत जागरुक असल्याचे जाणवत आहे़ अनेक उमेदवारांचा पहाटेच दिवस सुरू होतो़ काही जण दररोज आपल्या प्रभागातील वेगवेगळ्या बागेमध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्यांच्या भेटीगाठी घेतानाच त्यांच्याबरोबर चालण्याचा व्यायाम करतात़ त्यानंतर घरी येऊन नाष्टा करताना विविध वृत्तपत्रांचे वाचन होते़ सकाळी दहानंतर प्रभागातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट, त्यांच्याशी चर्चा करून साधारण सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पदयात्रा सुरू होते़ बरोबर गाडीत पाण्याची बाटली ठेवलेली असते़ दुपारी १ च्या सुमारास पदयात्रा संपल्यावर पुन्हा कार्यालयात जातात़ तेथे घरचा डबा आलेला असतो़ जवळच्या कार्यकर्त्यांबरोबर जेवण घेतले जाते़
उमेदवारांचे घरच्या डब्याला प्राधान्य
By admin | Updated: February 17, 2017 05:08 IST