केडगाव : दौंड तालुक्यात उसासाठी सरसकट एकरकमी १८०० रुपये बाजारभाव देण्याचा निर्णय दौंड तालुक्यातील गुऱ्हाळमालक संघटनेने घेतला आहे. यापूर्वी उसाच्या प्रकारानुसार, दर्जानुसार हा बाजारभाव चालू वर्षी १८०० ते २२०० पर्यंत असायचा. केडगाव येथे झालेल्या दौंड व पश्चिम हवेलीतील ५०० परप्रांतीय गुऱ्हाळचालकांची बाजाराबाबत बैैठक झाली. यात चालकांनी गुऱ्हाळ मालकाकडून एकरकमी २२०० रुपये दराने ऊसखरेदी करावा, असा निर्णय एकमताने घेतला. यासंदर्भात गुऱ्हाळ चालक नीर अलीम म्हणाले, की अनेकदा गुऱ्हाळ मालक जबरदस्तीने आमच्याकडून उसाचे दर घ्यायचे. त्यामुळे प्रत्येक परप्रांतीय गुऱ्हाळचालकांवर कर्ज झाले. यातून गुऱ्हाळ मालकांचे देणे थकल्याने परिसरातील ५ परप्रांतीय चालक पैसे बुडवून पळून गेले. यामुळे गुऱ्हाळ मालकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे आम्हालाही ऊसखरेदी परवडावी या भावनेतून सर्वांनी निर्णय घेतला. पिंपळगावचे गुऱ्हाळ मालक भाऊसाहेब जगताप म्हणाले, की सध्या साखरेचे व उसाचे दर उतरले आहेत. गुऱ्हाळ मालकांना परप्रांतीय गुऱ्हाळचालकांनी लाखो रुपयांना टाकून जाण्याच्या प्रकारामुळे मालक धास्तावले आहेत. त्यादृष्टीने सद्य:स्थितीत आमच्यासाठी वरील निर्णय समाधानकारक आहे. ऊसउत्पादक शेतकरी उल्हास कोंडे म्हणाले, की सध्याच्या कारखानदारी व गुऱ्हाळचालकांचा निर्णय अयोग्य वाटतो. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना एकरी ऊस लागवडीस येणारा खर्च पाहता शेतकरी तोट्यात जाण्याची लक्षणे आहेत. (वार्ताहर)
उसाला देणार एकरी १८०० रुपये भाव
By admin | Updated: June 30, 2015 22:55 IST