पुणे : शाळेत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असताना शहरातील तीन शाळांकडून त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या शाळांवरील कारवाईबाबतचा अहवाल गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागातील अधिकारी तयार करीत होते. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी या शाळांची मान्यता काढून घेण्यासंदर्भातील अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकांसमोर सादर असून, हा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे.वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल, वारजे परिसरातील सह्याद्री स्कूल, तसेच स्प्रिंगडेल स्कूल या तीन शाळांमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांकडे शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे संबंधित शाळांवर कारवाई केली जावी, अशी मागणी पीडित पालक व संघटनांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने संबंधित शाळांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी समित्यांची स्थापनाकेली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून हा अहवाल तयार करण्याबाबत टाळाटाळ केली जात होती.शिक्षण संचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर अखेर याबाबतचा अहवाल तयार झाला. संबंधित तीन शाळांची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, याबाबतच्या प्रस्तावावर सादर केल्यानंतर शासन या शाळांची मान्यता काढणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यात दोन शाळा राज्य शिक्षण मंडळाच्या, तर एक शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची आहे.
शाळांतील लैंगिक अत्याचाराचा अहवाल तयार
By admin | Updated: March 10, 2015 04:57 IST