खळद : श्री संत सोपानकाकांच्या सासवडनगरीतील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी १४ जुलै रोजी खंडेरायाच्या जेजुरीनगरीत पोहोचणार आहे. या वेळी दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा आदिमाया, आदिशक्ती येमाईमातेच्या भूमीत येमाई शिवरी येथे विसावणार असून, याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.या विसाव्याच्या वेळी प्रस्थानानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढून येमाईदेवीच्या भेटीला नेण्याची परंपरा आहे. या वेळी शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, खेंगरेवाडी, भाटमळवाडीसह परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करतात.पालखी सोहळा जरी उद्या मंगळवारी येणार असला तरी आज संपूर्ण रस्ता ‘माऊली, माऊली’च्या जयघोषाने दुमदुमून गेल्याचे पाहावयास मिळत होत़े़ रस्त्याच्या कडेला अनेक अन्नछत्र, मोफत औषधोपचार केंद्र, हॉटेल पाहावयास मिळत होते, तर दमून थकलेले वारकरी विसाव्यासाठी रस्त्याच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी थांबत होते़ येथे भजन, कीर्तन, भारूड, गोंधळही पाहावयास मिळत होते. (वार्ताहर)अन्नछत्रातून समाजप्रबोधन....- खळद येथे आनंदाश्रम स्वामी शिरेगाव यांचे शिष्य आपल्या गुरूच्या उपदेशानुसार गेली नऊ वर्षांपासून सलग तीन दिवस मोफत अन्नछत्र चालवत आहेत़ येथे हजारो वारकऱ्यांना याचा लाभ मिळत होता, तर अन्नदान करताना त्यांच्याकडून झाडे जगवा, पाणी साठवा, प्रदूषण टाळा, निसर्गाला साथ द्या, असे आवाहनही या माध्यमातून होत असल्याचे पाहावयास मिळाले.
येमाई शिवरीत विसाव्याची तयारी पूर्ण
By admin | Updated: July 13, 2015 23:46 IST