लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोणत्या वयातील रुग्ण दगावले व त्यापैकी किती रुग्णांना दुसरे आजार होते, याबाबतचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात रविवारी (दि. २०) कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूची सद्य:स्थिती, म्युकरमायकोसिसची सद्य:स्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
पवार म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि, कोणीही गाफील राहून चालणार नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात, तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. पॉझिटिव्हिटी रेट पाहून निर्बंध शिथिल करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी सहा मिनिटे चालायची सोपी टेस्ट करून घ्या, जर ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन पेशंटला अॅडमिट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली, तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
------------------------------
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्या...
बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हिटी रेट पाहून निर्बंध शिथिल करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
---------------------------
संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी खबरदारी घ्या...
पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली, तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-----------------------------
‘हरित बारामती-हरित तांदूळवाडी’ उपक्रमाचा शुभारंभ...
नगरसेवक जय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या 'हरित बारामती, हरित तांदूळवाडी' उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तांदूळवाडी येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी नगरपरिषदचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बारामती दूध संघाच्या वतीने कोरोनाने निधन झालेले कर्मचारी भगवान रामचंद्र दडस व शंकर दगडू खांडेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाखांचे धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सुपूर्द केले. तसेच मॅगनम इंटरप्रायजेस, बारामती यांच्याकडून मास्क आणि अॅंटिजन किट देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वैद्यकीय विभागास सुपूर्द करण्यात आले.
-------------------------
फोटो ओळी : कोरोनामुळे निधन पावलेल्या बारामती दूध संघाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
२००६२०२१-बारामती-०१
--------------------------