केडगाव : येथील परप्रांतीय गुऱ्हाळघरांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा वापर जळण म्हणून करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० ते १५ टनांपर्यंत कचऱ्याच्या गाड्या खाली होत आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोठ्या रुग्णालयातील हा वैद्यकीय कचरा येत असल्याचे समजते.
केडगाव, दापोडी, खोपोडी येथे परप्रांतीयांची गुऱ्हाळघरे आहेत. या ठिकाणी काही दिवसांपासून कोरोनाकाळात काळामध्ये वैद्यकीय सुविधेमध्ये सुरक्षा म्हणून वापरलेल्या वस्तू जळण म्हणून वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. गुऱ्हाळघरांबाहेर हा वैद्यकीय कचरा साठवला जात आहे. यामध्ये पीपीई किट, मास्क, हातमोज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा कचरा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मोठमोठ्या दवाखान्यांतून येत असून, १० ते १५ टनांपर्यंत कचऱ्याच्या गाड्या खाली होत आहे. गुऱ्हाळघरातील परप्रांतीय कामगार कोणतीही सुरक्षितता न बाळगता हा कचरा हातामध्ये घेऊन जळण म्हणून गुऱ्हाळघराच्या तुला चुलीमध्ये घालत आहेत. कचऱ्याला हात लावताना त्यांना कसलीही भीती वाटत नाही. या कचऱ्यामुळे गुऱ्हाळघरातून धूर बाहेर पडत असून वायूप्रदूषण होत आहे.
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष नानासाहेब टेंगले यांनी स्वतः गुऱ्हाळघरावर जाऊन पाहणी केली असता परप्रांतीय कामगार कसलीही काळजी न घेता या वैद्यकीय कचऱ्याला हाताळताना दिसले. विशेष म्हणजे या कचऱ्याची दुर्गंधी येत होती. यासंदर्भात टेंगले यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून संबंधित गुऱ्हाळघरावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांंच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वैद्यकीय कचऱ्याचा गुऱ्हाळ घरांमध्ये जळण म्हणून वापर होणे हा धक्कादायक प्रकार आहे. याबाबत माहिती मिळाली आहे. त्वरित या संदर्भात प्रदूषण कार्यालयाला माहिती दिली असून, अशा गुऱ्हाळघरांवर कारवाई करणार आहे.
संजय पाटील, तहसीलदार दौंड
गुऱ्हाळघरे ठरतायेत असून अडचण नसून खोळंबा
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस पिकवणारा तालुका म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जाते. प्रतिवर्षी दौंड तालुक्यामध्ये आहे २५ लाख टन ऊस पिकवला जातो. त्यामुळे या परिसरात परप्रांतीय ४०० गुऱ्हाळे कार्यरत आहेत. तालुक्यातील साखर कारखाने व गुऱ्हाळामुळे शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर जात आहेत. परंतु या गुऱ्हाळांमुळे सध्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीवघेणे फुप्फुसाचे आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून ही परप्रांतीय गुऱ्हाळे सध्या असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत.