मिलिंद कांबळे, पिंपरीश्रीमंत समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्य आणि राष्ट्रीय शालेय, महाविद्यालयीन खेळाडूंना महिना ४१६ आणि जिल्हा खेळाडूंना २५० रुपये इतकी अल्प मासिक शिष्यवृत्ती दिली जाते. इतक्या कमी रकमेत खेळाडूंना आहारावरही खर्च करता येत नाही. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याची मूळ संकल्पना दूर राहत आहे. विविध योजनांसाठी महापालिका दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, खेळाडूंना देण्यात येणाऱ्या क्रीडा शिष्यवृत्ती खूपच तुटपुंजी आहे. राष्ट्रीय शालेय खेळाडंूना वार्षिक ५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, तर राज्य शालेय आणि आंतरमहाविद्यालय स्पर्धेत सहभागी खेळाडंूना वार्षिक ३ हजार रुपये शिष्यवृत्ती आहे. याप्रमाणे खेळाडूंस महिना ४१६ व २५० रुपये इतकी रक्कम मिळते. या रकमेत साधा आहाराचा खर्च करू शकत नाही. तसेच, महागडे ट्रॅकसूट व इतर साहित्य खरेदी करू शकत नाही. शहरातील मैदाने, हॉल आणि जलतरण जलाव दूर अंतरावर आहेत. सरावासाठी तेथे ये-जा करण्यासाठी महिन्यास ५०० रुपये कमी पडतात. प्रशिक्षकाचे शुल्क, स्पर्धा प्रवेशाची रक्कम, स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना स्वत:च रक्कम भरावी लागते. तसेच, विविध कारणांनी होणारा खर्च वेगळाच आहे. त्यातच खेळाडू जखमी झाल्यास वा आजारी पडल्यास त्याच्यावर वैद्यकीय उपचारांचा भार पडतो. महापालिकेने सरावासाठीची मैदाने, तलाव आणि हॉलला शुल्क आकारले आहे. ते शुल्क भरल्याशिवाय मैदानात पाय ठेवू दिला जात नाही. पुणे शहरात सरावासाठी जाण्याचा खर्च दुपटीने वाढतो. विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला हजारो रुपये खर्च करावे लागतात. खेळाडूंचा हा खर्च पाहता महापालिकेकडून मिळणारी शिष्यवृत्ती अगदीच तुटपुंजी आहे.
श्रीमंत महापालिका खेळाडूंसाठी गरीब
By admin | Updated: June 22, 2015 04:29 IST