राहू : वडगावबांडे ते अरणगावदरम्यान भीमा नदीवरील बंधारा जड वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या बंधाऱ्याला कठडे नसल्याने कित्येक वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. गेली तीन वर्षांपूर्वी याच बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर कठडे नसल्याने नदीपात्रात कोसळला होता; परंतु कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याच बंधाऱ्यांच्या पूर्वकेडील बाजूस अरणगाव हद्दीत वाहने ये-जा होताना कठडा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याने या कठड्याची उंची कमी करणेकामी संबंधित खात्याने लक्ष घालण्याची जोरदार मागणी होत आहे. याच बंधाऱ्याच्या दोन्ही भाराव्यावर उपसा सिंचन योजनांचे पाईप फुटल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलावरून दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. (दि. १५) रोजी अरणगाव येथील यात्रा असल्याने एक युवक दुचाकीवरून याच बांधारूवरून जात असताना दुचाकी घसरून युवक पडला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. त्यामुळे या बंधाऱ्याच्या भराव्याचे काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे.याबाबत वडगावबांडे येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबूराव पिंगळे म्हणाले, की वस्तूत: याबाबत संबंधित खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या जीवितास धोका होत असताना संबंधित खात्याचे आधिकारी काय करतात, या कामाबाबत या खात्याने योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर, हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर उपोषणाचा इशारा दिला आहे.
अरणगावचा पूल धोकादायक
By admin | Updated: November 17, 2016 02:30 IST