पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ला लस पुरविण्यासाठी आवश्यक ती ऑर्डर केंद्र शासनाकडून मिळाल्याची माहिती आम्हाला समजली आहे. देशभरात कोविड लसचा पुरवठा पुण्यातून होणार आहे. त्याचे महत्व लक्षात घेऊन आम्ही आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. सिरम इन्स्टिट्युटमधून देशभरात पाठविण्यासाठी लस घेऊन निघणारी वाहने कधी बाहेर पडणार याविषयीची माहिती संस्थेने अद्यापपर्यंत पोलिसांनी कळविण्यात आलेली नाही.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोवीड लसीचे उत्पादन होत आहे. त्याचे महत्व लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून सिरम इन्स्टिट्युटला पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. पोलीस व्हॅन तसेच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्युटमधील लसीची वाहतूक करणार्या ट्रान्सपोर्ट कंपनीने पोलिसांनी सुरक्षा पुरविण्यासाठी पत्र दिले असून सिरममधून लस घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनांची माहिती मिळल्यानंतर आम्ही या गाड्यांना सुरक्षा पुरविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
सिरममधून लस घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनांना वाटेत अडथळा होऊ नये. यासाठी प्रत्येक वाहनांबरोबर एक पोलीस व्हॅन असणार असून त्यात चार पोलीस अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. त्यातील पोलीस सशस्त्र असणार आहेत.