मंगेश पांडे, पिंपरीसर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर वाढला असताना पोलीस खातेही मागे नसल्याचे दिसत आहे. पूर्वी तक्रार घेणे, जबाब अथवा एखादा गुन्हा नोंदविण्याच्या कामकाजाचे कागदावर लिखाण करताना पोलिसांवरही ताण यायचा. आता बहुतेक कामकाज संगणकावर होत असून, पोलीसही स्मार्ट झाल्याचे दिसून येते. पोलीस ठाण्यांमध्ये संगणकीकरण झाल्याने पोलिसांचे कामही सोपे आणि जलद झाले आहे. परिमंडळ तीनच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी आणि वाकड अशी आठ पोलीस ठाणे आहेत. औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या या शहरात मोठमोठ्या कंपन्यांसह आयटी पार्कदेखील आहे. शहर वेगाने विकसित होत असताना पोलीस यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. या दृष्टीने शहरातील पोलीस ठाण्यांचेही संगणकीकरण करण्यात आले आहे. गुन्हा घडल्यास गुन्ह्याची नोंद करण्यापासून पुढील तपासासाठी तत्परताही महत्त्वाची असते. या कामकाजात ठाण्यांचे संगणकीकरण झाल्याचा मोठा फायदा होत आहे. पोलीस खात्यात जुन्या गुन्ह्यांच्या माहितीची कधीही गरज लागू शकते. एखाद्या गुन्ह्यात पकडलेला आरोपी इतरही गुन्ह्यांत असतो. दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी, तसेच त्याची पार्श्वभूमी आदींबाबत माहितीची पोलिसांना आवश्यकता असते. अशावेळी संगणकावर संकलित केलेली माहिती उपयुक्त ठरते. तातडीच्या वेळी जुन्या फायली तपासण्याऐवजी संगणकावर एका क्लिकवर सविस्तर माहिती मिळत आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी असते. या डायरीत गुन्ह्याची नोंद केली जाते. आता हे कामकाजही थेट संगणकावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्याने भरती होत असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अधिकच ‘स्मार्ट’ असल्याचे दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड असलेले या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संगणकासह विविध प्रकारचे तांत्रिक ज्ञानअवगत आहे. यासह त्यांच्याकडील मोबाईल, टॅब, लॅपटॉप याचाही तपासकार्यात चांगला फायदा होत असल्याचे दिसून येते. आरोपींचा शोध घेत असताना मोबाईल लोकेशनवरुन पोलीस आरोपींचा माग काढतात. तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणचे फोटो अथवा इतर माहिती वरिष्ठांना पाठवायची असल्यास ‘व्हॉट्सअॅप’चा उपयोग केला जात आहे. ‘वॉन्टेड’ गुन्हेगाराबाबतची माहिती इतर पोलीस ठाण्यांना देतानाही या तंत्राचा उपयोग केला जात आहे.
पोलीस ठाणे हायटेक
By admin | Updated: November 10, 2014 05:14 IST