पिंपरी : विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वयंसेवकांचीही मदत घेणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी दिली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील बहुतेक सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी सुरुवात होते. यामुळे रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी असते. घरगुती गणपती विसर्जनाचीही लगबग असते. यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गांसह मुख्य चौकांत अधिक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी उपायुक्त १, सहाय्यक आयुक्त २, पोलीस निरिक्षक १९, सहायक निरिक्षक व फौजदार १११, पुरुष कर्मचारी ६९६, महिला कर्मचारी १०५, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी आणि गृहरक्षक दलाचे ८० जवान तैनात असतील. तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह इतरही स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. स्काऊटचे विद्यार्थीही मिरवणूक नियोजनात सहभागी होतील. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून व्हिडीओ कॅमेरा बसविलेले वाहन तयार करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यातून ठिकठिकाणचे छायाचित्र आणि चित्रीकरण करण्यात येणार आहे. मुख्यालयाकडून परिमंडळ तीनला याप्रकराचे एक वाहन देण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे प्रकाश मुत्याळ म्हणाले. (प्रतिनिधी)
पोलीस घेणार स्वयंसेवकांची मदत
By admin | Updated: September 8, 2014 04:09 IST