पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पोलीस वसाहतींची दुरवस्था झाली आहे. मात्र, शासनाकडून कामांसाठी अपुरा निधी दिला जात असल्याने इमारतींवर केवळ मलमपट्टी केली जात आहे. दुरवस्था झालेल्या पोलीस वसाहतींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) सुमारे वर्षभरापासून डागडुजीची कामे केली जात आहेत. मात्र, शासनाकडून प्राप्त होणारा निधी तुटपुंजा असल्याने इमारतींवर केवळ मलमपट्टी केली जात आहे. शासनाकडून या कामांसाठी नव्याने दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. परंतु, हा निधीसुद्धा अपुराच आहे, असे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.राज्य शासनाने पोलीस वसाहतींच्या डागडुजीसाठी यंदा ६ कोटी २० लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून शिवाजीनगर, स्वारगेट, सोमवार पेठ, भवानी पेठ, औंध, इंद्रायणीनगर, खडकी बाजार, कावेरीनगर आदी ठिकाणची कामे केली जात आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत.>पंधरा ठिकाणी दुरुस्तीसार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुणे व पिंपरी-चिचवड शहरात १५ ठिकाणी पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीची काम केली जात आहेत. त्यात प्रामुख्याने छत गळणे, दरवाजे बसवणे, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या कामांना प्राधान्य दिले जाते. परंतु, दुरुस्ती करूनही पोलीस वसाहती पूर्णपणे सक्षम होत नाही. वर्षभराच्या आतच या इमारतींचे दुसरे काम करावे लागते.>सोमवार पेठेत ३८४ खोल्यांची वसाहत असून भवानी पेठेत २०८ खोल्यांची वसाहत आहे. त्याचप्रमाणे स्वारगेट येथे ७०३ कुटुंब राहतात. शिवाजीनगर येथे तब्बल १ हजार ६२४ खोल्यांची वसाहत आहे. तर गोखलेनगरमध्ये १९४, विश्रांतवाडी येथे ३०४ खोल्या आहेत. खडक येथे १८ बैठ्या चाळी आहेत.>पोलीस वसाहतींची संख्या आणि शासनाकडून प्राप्त होणारा निधी यांची सांगड घालता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वरवरची कामे करून पोलिसांना काही दिवस ब-या स्थितीत राहता येईल, या दृष्टीने कामे केली जात आहेत, असेही अधिका-यांकडून खासगीत सांगितले जात आहे.
पोलीस वसाहतींवर मलमपट्टीच, दुरवस्थेमुळे राहणेही मुश्कील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:49 IST