पुणे : दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पुणे महागनर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सारथ्य बेशिस्त हातात असल्याचे चित्र आहे. चालक व वाहकांकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळत नसल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडताना दिसत आहे. पीएमपी प्रशासनाकडून दंडात्मक, निलंबनाची कारवाई करून बेशिस्तीला आळा बसताना दिसत नाही.बसमधील आसनाला धडकल्याने जखमी झालेल्या प्रवाशाला चालक व वाहकाने रस्त्यातच सोडून पळ काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना दि. २६ डिसेंबर रोजी चऱ्होली रस्त्यावर घडली आहे. ज्ञानेश्वर रघुनाथ अभंग (वय ५७, रा. चऱ्होली) असे प्रवाशाचे नाव असून, त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बसचालक राजकुमार श्रीधर चौधरी व वाहक काळुराम गंगाराम काळजे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराप्रमाणेच पीएमपी बसचालक व वाहकांविषयी प्रवाशांच्या विविध तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत असतात. दर महिन्याला साधारणपणे दीड हजार तक्रारींची नोंद तक्रार विभागात होत आहे. त्यामध्ये चालकांविषयीच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर यातील अनेक चालक हे ठेकेदारांच्या बसवरील आहेत. यावर्षी जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांत सुमारे साडेसहा हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. त्यामध्ये प्रवाशांनी हात दाखवूनही चालकाने बस न थांबविल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. हे प्रमाण १२०० हून अधिक आहे. त्यापाठोपाठ प्रवाशांशी उद्धट वर्तन, वाहतुकीचे नियम न पाळणे, बस स्थानकालगत उभी न करता रस्त्याच्या मधोमध उभी करणे, भरधाव वेगाने बस चालविणे, बस चालवत असताना मोबाईलवर बोलणे, प्रवास बसमध्ये चढण्याआधी बस सुरू करणे यांसह विविध तक्रारींचा समावेश आहे. अनेक प्रवाशांकडून तक्रारी केल्याही जात नाहीत. ठराविक प्रवाशांकडूनच तक्रारी केल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्षात तक्रारींचा आकडा खूप मोठा असू शकतो. तक्रारींवर पीएमपी प्रशासनाकडून कार्यवाही करून चालक व वाहकांवर दंडात्मक, निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही तक्रारी कमी झालेल्या दिसत नाही. (प्रतिनिधी)
पीएमपीचे सारथ्य बेशिस्त हातात
By admin | Updated: January 3, 2017 06:36 IST