पुणे : महापालिकेच्या धर्तीवर पीएमपीएमएल मधील कर्मचा-यांना अंशदायी वैद्यकीय सेवा मंजूर करण्यात आली असली तरी त्या बाबतचे आदेश अद्याप मिळाले नसल्याचे कारण पुढे शहरातील प्रमुख रूग्णालयांकडून ही सेवा नाकारली जात आहे. कर्मचाऱ्यांना पदरमोड करून उपचार घ्यावे लागत आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पीएमपी मधील सुमारे साडे अकारा हजार कर्मचारी आणि 2 हजार 500 सेवा निवृत कर्मचा-यांना पीएमपीने 90 टक्के तर कर्मचा-यांनी 10 टक्के रक्कम भरून शहरातील खासगी रूग्णालयांमध्ये उपचार देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी अद्याप रूग्णालयांना या बाबतच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. या प्रकारामुळे कर्मचा-यांना मनस्ताप तसेच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून महापालिका प्रशासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी केली आहे. या प्रकारामुळे कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर असून कर्मचा-यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व रूग्णालयांना तातडीने उपचाराचे पत्र स्विकारण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही खराडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
पीएमपी कर्मचाऱ्यांना मिळेना वैद्यकीय सुविधा
By admin | Updated: May 6, 2016 05:53 IST