पुणे : स्वारगेट ते धनकवडी या मार्गावरील पीएमपी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या तिकीट काढण्यास सांगितल्याने वाहकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
प्रवीण भाऊसाहेब रणदिवे (वय ५५, रा. धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पेठकर (वय ४५, रा. आंबेगाव बु.) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठकर हे पीएमपीमध्ये वाहक म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी ते स्वारगेट ते धनकवडी या बसमध्ये नेमणुकीला होते. स्वारगेटवरून बस निघाल्यानंतर पुढील दरवाजापासून प्रवाशांची तिकेटे काढत मागील दरवाजापर्यंत गेले. त्यावेळी आरोपी हा सीटवर बसलेला होता. त्याला पेठकर यांनी तिकीट काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिकीट काढल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांन त्याला तिकीट दाखविण्यास सांगितले. त्याने तिकीट दाखविले असता ते जुने असल्याचे आढळून आले. त्यांनी त्याला हे तिकीट जुने असून नवीन तिकीट काढण्यास सांगितले. त्याचा रणदिवे याला राग आला. त्याने पेठकर यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, त्यांना हाताने मारहाण करून धमकाविले.