लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : खेड तालुक्यात येनवे बुद्रुक येथे भूखंड देतो, असे आमिष दाखवून सुमारे ७५ लोकांकडून घेतलेल्या एक कोटी २ लाख ८८ हजारांच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सतीश देविदास झोंड (वय ३९, रा. सफायर पार्क,जे बिल्डिंग,पार्क स्ट्रीट सोसायटी, वाकड) या आरोपीविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमो सिटी, साईलीला या गृहप्रकल्पांच्या नावे आरोपी झोंड याने ग्राहकांकडून पैसे उकळले. तळवडे, त्रिवेणीनगर येथे निरजा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या नावाने कार्यालय उघडून फेब्रुवारी २०१५ पासून ग्राहकांकडून पैसे उखळले जात होते. बनावट लकी ड्रॉ काढून ग्राहकांची दिशाभूल केली. ७५ लोकांचे वेळोवेळी पैसे घेतले. त्यांना खेड तालुक्यातील येनवे बुद्रुक या गावी भूखंड देणार असल्याचे सांगितले.समर्थनगर, प्राधिकरण येथील पार्वती रेवणसिद्ध चौधरी यांनी याप्रकरणी शनिवारी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही लोकांना अशाच प्रकारे फसवले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडे आणखी तक्रारी दाखल झाल्यास कारवाई केली जाईल, असे पोलीस उपनिरीक्षक एस़ एम़ सूर्यवंशी यांनी सांगितले.रकमा घेतल्या; जागेचा ताबा देण्यास टाळाटाळप्रत्यक्षात मात्र ग्राहकांना जागेचा ताबा दिला नाही. ग्राहकांना जागेचा ताबा देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी पैसे परत मागितले. भूखंडासाठी दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी त्यांनी केली. करारात नमूद केल्यानुसार भूखंड दिले जात नसतील, तर गुंतविलेली रक्कम परत द्यावी, अशी आग्रही मागणी होऊ लागली. त्यामुळे आरोपी झोंड याने त्यांना परताव्याच्या रकमेचे धनादेश दिले. संबंधित गुंतवणूकदारांनी धनादेश बँकेत भरले. मात्र आरोपीने दिलेले धनादेश वटले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
भूखंडाच्या आमिषाने कोटींचा गंडा
By admin | Updated: May 8, 2017 03:00 IST