पुणे : येत्या वर्षभरात पुण्यातील किमान ५० हजार कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा पाईपलाईनद्वारे करण्यात येईल, असे पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. गॅस ग्राहकांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांना प्रधान यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमजीएनएल) तसेच बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या कंपन्यांनी सिद्धी गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश मुळीक, भीमराव तापकीर तसेच पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वांनी गॅसचा वापर करावा, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध योजना तयार केल्या जात आहेत. वाहनांसाठीही सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला पाहिजे. मुंबई-पुणे रस्त्यावर त्यासाठी पंप नाही. तो सुरू करून हा रस्ता ग्रीन कॉरिडॉर करण्यात येईल, असे प्रधान म्हणाले.
५० हजार घरांना पाईपलाईनने गॅस
By admin | Updated: October 11, 2015 04:32 IST