पुणे : ‘पियानो’ हे खरंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाद्य... त्याचे सूर, अंदाज काहीसा वेगळा! या वाद्यातून हिंदुस्थानी रागदारीचे सूर कानी पडणे तशी अशक्यप्रायच बाब. पण याच पियानोमधून शास्त्रशुद्ध अभिजात संगीताचा अद्भूत आविष्कार शनिवारी ‘कानसेनां’नी अनुभवला. पाश्चात्त्य आणि हिंदुस्थानी वाद्यांच्या सुरेल गुंफणीतून साकार झालेल्या ‘नादमाधुर्या’तून स्वरांची सुरेख पखरण आसमंतात झाली आणि त्या प्रत्येक सुरांमध्ये रसिकजन हरवून गेले. निमित्त होते, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगलेल्या ‘रागा सिंफनी’ या सांगीतिक मैफलीचे. पियानोची ओळख पाश्चात्त्य वाद्य अशी असली तरी त्याच्या प्रत्येक नोट्समधून सप्तसुरांची अप्रतिम उधळण पियानोवादक दीपक शहा यांनी रसिकांवर केली. पियानो, व्हायोलिन, बासरी, सतार, पखवाज आणि तबला या वाद्यांच्या सुरेल मिश्रणातून राग सिंफनीची खऱ्या अर्थाने प्रचिती आली. हंसध्वनी रागापासून मैफलीस सुरुवात झाली आणि त्यानंतर राग यमन, राग जोग आदींच्या सुरावटीतील नजाकत रसिकांनी अनुभवली. दीपक शहा यांनी पियानोवर पर मिनिट 390 नोट्सची रागदारी वाजवून गिनीज बुक रेकॉर्ड केले आहे, त्याची झलक त्यांनी पेश केली. राधा-कृष्णाच्या विरहाची दर्दभरी स्थिती विशद करणाऱ्या ‘ठुमरी’ने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. भारतीय आणि पाश्चात्त्य वाद्यांवर सादर झालेल्या जोग रागातील अप्रतिम सुरावटीने रसिकांची मने जिंकली. ‘वन्स मोअर’च्या निनादात रसिकांनी वातावरण दणाणून सोडले. भटियार, भैरव, बिलासखानी, तोडी, शुद्ध सारंग, भीमपलास, पूरिया धनश्री आणि मालकंस याची रागमालिका सादर झाली. पियानोसह व्हायोलिनवर भारत शहा, बासरीवर सुचिस्मिता चॅटर्जी, सतारीवर उमाशंकर शुक्ला, पखवाजवर माधव पवार आणि तबल्यावर श्रीधराचार्यजी यांच्या सुरेल सादरीकरणाने मैफलीला अनोखा रंग चढला. (प्रतिनिधी)
पियानो... रागदारी... अद्भुत अनुभव
By admin | Updated: May 17, 2015 01:04 IST