जेजुरी : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पुरंदरमधील सर्वच्या सर्व जागा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे तालुकाध्यक्ष संदीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथे या पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी पुरंदर शेकापचे युवक अध्यक्ष मनेश हगवणे, युवा नेते अजयसिंह सावंत, व्याख्याते अक्षय चाचर आदी उपस्थित होते. या वेळी जगताप यांनी सांगितले, की पुरंदर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे जुने जाणते असंख्य कार्यकर्ते आहेत. तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलेला आहे. पक्षप्रवेशानंतर या पक्षाकडून पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पूर्वी वाल्हे येथील कै. भाई बाबूराव पवार यांच्या रूपाने तालुक्याला शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार लाभले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीपासून सुरुवात करणार आहे. (वार्ताहर)
शेकाप सर्व जागा लढविणार : जगताप
By admin | Updated: January 25, 2017 23:59 IST