निगडी : ‘‘यापूर्वी पदवीला मोठे महत्त्व होते, पण काळानुसार आज पीएचडी ही पदवीसुद्धा किमान पात्रता झाली आहे,’’ असे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात संपूर्ण संस्थेतील 12 महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी माजी राज्यसभा सदस्य, नियोजन आयोग सदस्य आणि अर्थतज्ज्ञ मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद संस्थेचे मानद सचिव संदीप कदम यांनी भूषविले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घाडगे, मोहनराव देशमुख, श्री. पी. ई. कुलकर्णी, ए. एम. जाधव, डॉ. मनोहर चासकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, संस्थेच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, परिक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. मुणगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाला सुरूवात झाली. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी संस्थेच्या 12 महाविद्यालयांचा हा समारंभ असून, यामध्ये एकूण 1533 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुणगेकर यांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मंजूषा धुमाळ यांनी करून दिला.डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘ आपल्या देशात पदवी आणि नोकरी याचा जवळचा संबंध असून पदवी घेतलेल्या तरूणांना नोकरी पुरविणे ही आजची गरज आहे. जर त्यांना रोजगार पुरविला गेला नाही तर ही लोकसंख्या आपत्ती ठरेल. रोजगाराची क्षमता असणे आणि रोजगार मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.’’ (वार्ताहर)
पीएच.डी. पदवीसुद्धा झाली किमान पात्रता
By admin | Updated: February 15, 2017 02:00 IST