पुणे : देशातील विविध उद्योग क्षेत्रांचा विचार करता सध्या फार्मसी इंडस्ट्रीचा विकास दर सर्वाधिक असून, तो आता १७ टक्क्यांवर गेला आहे. त्यातच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) प्रत्येक मेडिकलमध्ये ‘फार्मसिस्ट’ची सक्ती केल्याने गेल्या दोन वर्षांपासून डी.फार्मसी व बी.फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. तसेच एफडीएकडून दर महिन्याला सुमारे १५० मेडिकलची तपासणी केली जात असल्याने अलीकडच्या काळात फार्मसिस्ट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले दिवस आले आहेत.सिंहगड कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. एम. गुजर म्हणाले, की जानेवारी २०१५ मध्ये फार्मसी अॅक्ट २०१५ अंतर्गत फार्मसिस्टला डॉक्टरांच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. तसेच पाच प्रकारच्या फार्मसिस्टला मान्यता मिळाली आहे. त्यात मेडिकलमधील कम्युनिटी फार्मसिस्ट, हॉस्पिटल, ड्रग इन्फॉर्मेशन आणि क्लिनिकल फार्मसिस्ट यांचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्लंड देशाबरोबर नुकताच औषधनिर्मितीशी निगडित असलेल्या करारावर सह्या केल्या आहेत. देशातील आयटी क्षेत्राचा विकास दर दोन अंकी नाही, परंतु फार्मसी इंडस्ट्रीचा विकास दर १७ टक्के असून, त्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच जेनरिक औषध निर्मितीमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याने फार्मसी अभ्यासक्रमाची पदविका किंवा पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)
फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस
By admin | Updated: September 25, 2015 00:47 IST