पुणे : पेट्रोल कंपन्यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असूनही शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लोणी येथील डेपो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील बहुतेक सर्व पेट्रोलपंप रविवारी पूर्ववत सुरू झाले. शनिवारी दिवसभर शहरातील मोजक्याच पेट्रोलपंपांवर पेट्रोल विक्री सुरू होती.बँकांना सलग सुट्टय़ा आल्याने पेट्रोल डिलर्सला डेपोतून पेट्रोल खरेदी करणे शक्य होणार नव्हते. पेट्रोल खरेदीसाठी बँकांमध्ये डिमांड ड्राफ्ट (डीडी) भरून तो डेपोमध्ये द्यावा लागतो. मात्र, बँकाना शुक्रवारी सुट्टी होती, तसेच आदल्या दिवशी पेट्रोलचे दर पावणे तीन रुपयांनी कमी झाले. त्यामुळे डिलर्सनी तोटा टाळण्यासाठी गुरुवारी पेट्रोल खरेदी केली नाही. परिणामी, बहुतेक पेट्रोलपंपांवरील साठा संपल्याने शनिवारी त्याचा परिणाम जाणवला. शहरातील विविध भागातील सुमारे ३५0 पेट्रोलपंपांपैकी सुमारे ९५ टक्के पंप शनिवारी दिवसभर बंद होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली होती. त्यातच रविवारी व सोमवारीही बँकांना सुट्टी असल्याने शहरात पेट्रोलची आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पेट्रोल डिलर्स असोसिएशनमार्फत पेट्रोल कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर हा पेच सुटला.तसेच, 'डीडी'चा आग्रह न धरता डिलर्सला हमीवर पेट्रोल देण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे रविवारी दिवसभर डेपोतून पेट्रोल खरेदी सुरू राहिली. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंप सुरू झाले.
पेट्रोलचा पेच सुटला
By admin | Updated: August 18, 2014 05:06 IST