पुणे : कोरोनामुळे सर्वच स्तरावरील आर्थिक घडी विस्कटली आहे़ अशावेळी सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याकरिता पैसा उभारणी आवश्यक आहे़ अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी पैसा कोठून आणायचा, म्हणून सेसद्वारे पेट्रोल, डिझेलची दरवाढ गरजेची असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले़
नव्याने सेस लावल्याने पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता आहे का, या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी दरवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ सोमवारी (दि. १) पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रतिप्रश्न उपस्थित करत, दर वाढीचे अप्रत्यक्ष समर्थन केले. तर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार का, या प्रश्नावर उत्तर देणेही त्यांनी टाळले. समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेऊन सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पाटील म्हणाले. कोरोना आपत्तीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे़
मोदीसरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडून गतीने आर्थिक विकास होण्यासाठीही अर्थसंकल्पात विचार केला असून, यात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. शेतीक्षेत्रात मोठी तरतूद आहे़ यामुळे शेतकऱ्यांची सावकारी कर्जापासून मुक्तता होणार असून शेतकऱ्यांना आनंद देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पाटील म्हणाले.
ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची तरतूद आहे. नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी तरतूद केली आहे़ अर्थसंकल्पात लघू उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. पंचाहत्तरपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सवलत दिली आहे. अशा विविध तरतुदींमुळे मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळाल्याचा दावा पाटील यांनी केला.