पुणे : पुरस्कारांच्यानिमित्ताने आजवर केलेल्या मेहनतीचे चीज झाले असून, पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे, अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या. पुण्याच्या कलाकारांनी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे. पुरस्कारामुळे चांगल्या कामाला न्याय मिळाल्याची भावनाही कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अभिनेता प्रसाद ओकचे दिग्दर्शनातले पदार्पण असलेल्या ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार देवस्थळीनिर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. जयवंत दळवी यांच्या ‘ॠणानुबंध’ या कादंबरीवर आधारित चित्रपटात गतिमंद मुलाच्या कुटुंबाचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. नागराज मंजुळेंना ‘पावसाचा निबंध’ या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. पावसाशी जुळलेली एका कुटुंबाची, एका गावाची कथा लघुपटातून रंजक पद्धतीने मांडण्याचा अनोखा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. २५ मिनिटे कालावधीच्या या लघुपटाचे चित्रिकरण मुळशी परिसरात झाले आहे. ‘पिस्तुल्या’ लघुपटानंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी हा दुसरा लघुपट दिग्दर्शित केला आहे.प्रसाद ओक म्हणाले, ‘चित्रपट दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्या जबाबदारीमध्ये खूप तफावत असते. त्यामुळे सुरुवातीला खूप दडपण आले होते. मात्र, संपूर्ण टीमच्या सहाय्याने हे शिवधनुष्य पेलता आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्व टीमचे एकत्रित यश आहे. पुरस्कारामुळे शाबासकीची थाप मिळाली असून, जबाबदारीही वाढली आहे.’>विशेष पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. चित्रपटनिर्मितीतील पहिल्याच प्रयत्नाला पुरस्काराच्या रुपाने मिळालेला राजाश्रय अत्यंत महत्त्वाचा आहे. विविध अडचणींवर मात करत चित्रपटाचा प्रवास झाला. पिफमध्येही चित्रपट गौरवला गेला. त्यामुळे कामाची उमेद वाढली आहे.- अमर देवकर, दिग्दर्शक आणि लेखक, म्होरक्या‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. प्रसाद ओकचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा आहे. चित्रपटासाठी केलेल्या कामाला चांगला न्याय मिळाल्याने खूप समाधान वाटत आहे.- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीचार-पाच वर्षांपासून लघुपटाची कल्पना सुचली होती. कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नव्हता. मागील पावसाळ््यात आठ-नऊ दिवस मुळशी, पवना, तिकोना परिसरात चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाइतकेच लघुपट हेही सशक्त माध्यम आहे. भविष्यातही लघुपटाच्या माध्यमातून विविध विषय मांडायचा प्रयत्न करणार आहे.- नागराज मंजुळे, दिग्दर्शक
पुरस्कारांमुळे मेहनतीचे चीज, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुण्याची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:56 IST