पुणे : शहरामध्ये सप्टेंबर २०१५ पासून लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीला ७ महिने पूर्ण झाले असून, या ७ महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. धरणातील उपलब्ध पाणी जून अखेरपर्यंत वापरण्याचे नियोजन असून, त्याकरिता आणखी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्के कपात करून ६ सप्टेंबर २०१५ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये असलेला उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे वितरण करण्यातील अडचणी, या सर्वांवर चर्चा करण्यात आली. एकंदरीत परिस्थिती पाहता शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय स्पष्ट झाल्याने एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने मान्यता दिली होती.एकदिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यापूर्वी शहराला एका महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागत होते. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यानंतर सध्या एक टीएमसी पाणी खडकवासला धरणातून उचलले जात आहे. पाणीकपात लागू होऊन ७ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानुसार या ७ महिन्यांमध्ये पावणे दोन टीएमसी पाण्याची बचत झाली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. भरारी पथकांकडून मात्र ठोस कारवाई नाहीपाणीकपात लागू करताना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याकरिता भरारी पथकांची स्थापना केली होती. मात्र, या भरारी पथकांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. बांधकामासाठी, वॉशिंग सेंटर, जलतरण तलावासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जलतरण तलावाचा निर्णय नंतर फिरविण्यात आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात सिमेंटच्या रस्त्यांची मोठी कामे काढून, त्यावर पाण्याची मोठी नासाडी झाली आहे.
पावणेदोन टीएमसी पाणी बचत
By admin | Updated: April 6, 2016 01:32 IST