पुणे : पुण्यातील ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहत आहेत. झोपडपट्टी सुधारणा ( एसआरए ) योजनेच्या नवीन नियमावलीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे़ त्यातील अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक बोलविण्यात येणार आहे़ या बैठकीत नियमावलीमुळे जाणवत आलेल्या अडचणी सोडविण्यात येतील. यासोबत पाणी, कचरा, वाहतूक यासारख्या प्रश्नांवर कालबद्ध काम केल्यास त्याचे चांगले परिणाम वर्षा दोन वर्षात दिसू लागतील आणि या समस्या मार्गी लागतील, असा आशावाद पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केला़पुण्यात होणाऱ्या सर्वपक्षीय सत्काराच्या निमित्ताने बापट यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ गेल्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात केवळ मुद्यांसाठी भांडलो. टेल्को युनियचा पदाधिकारी ते नगरसेवकापर्यंतच्या प्रवासानंतर आमदार म्हणूनही सर्वसमावेशकतेचे राजकारण केले. राजकारण एका बाजुला असतेच परंतु विकासाच्या भूमिकेवर समाजकारण केले. त्यामुळे सर्व पक्षांतील मित्र जोडले. पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी आली आहे. शहर व जिल्ह्यातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वपक्षीयांना सोबत घेऊन काम करणार आहे.’’ते म्हणाले, ‘‘ पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत जटील बनला आहे. बैठका घेऊन उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १७ दिवसात ऊरळी देवाची येथील कचरा डेपोत एकही गाडी गेली नाही़ तरीही शहरातील कचराकुंड्यातील ओला कचरा खतासाठी पाठविला जात आहे़ ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा करण्याचे काम वाढविण्यात आले आहे़ पूर्वी हे काम २८०० कचरा वेचक करीत असत़ त्यांची संख्या ३६०० वर नेण्याचा निर्णय सर्व पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे़ कचरा प्रश्नासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ५० ते ६० कोटी रुपये दिले आहेत़ ’’पुणेकरांसाठी आवश्यक तेवढे पाणी धरणात राखून ठेवण्यात येणार आहे़ याशिवाय वापरलेले पाणी रिसायकलिंग करुन ते कालव्यात सोडण्याची योजना लवकरच पूर्ण होत आहे़ हे पाणी शेतीसाठी मिळू लागल्यास पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही़, अशी ग्वाहीही बापट यांनी दिली. बापट म्हणाले, ‘‘शहरात साखळी चोऱ्या आणि गॅगवॉरच्या घटना वाढत चालल्या आहेत़ या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती़ नुकतीच पोलिसांना ३७ वाहने देण्यात आली आहेत़ त्यांचा उपयोग गस्त घालण्यासाठी होऊन गुन्हे कमी होतील, अशी आशा आहे़ ’’शहरातील अनेक प्रश्न हे प्रलंबित राहिल्याने ते लगेचच सुटतील, असे नाही़ त्यासाठी काही काळ द्यावा लागेल़ या प्रश्नांवर नियोजनबद्धरित्या काम केल्यास वर्षा दोन वर्षात चांगले रिझल्ट दिसू लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)राज्यात युतीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर पाचव्यांदा आमदार झालेले गिरीश बापट यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ आज (रविवारी) बापट यांचा सर्वपक्षीयांकडून सत्कार करण्यात येत आहे़ त्यानिमित्ताने ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत पुण्याला भेडसावणारे प्रश्न व त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. विकासाचे काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे़ त्यामुळे शहराच्या विकासात राजकारण न आणता सर्वांचे सहकार्य मला मिळत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पीएमपीमध्ये सुधारणा झाली तर शहरातील वाहनांची संख्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल़ त्याला काही काळ नक्कीच लागेल़ प्रथमत: श्रीकर परदेशी यांच्यासारखा चांगला माणूस मी मिळविला आहे़ त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे पीएमपी सुधारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे़ पुण्यातील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे़ दररोज ७०० वाहने नव्याने रस्त्यांवर उतरत आहेत़ सर्व प्रमुख सिग्नल सिंक्रोनाइज करण्यास सांगण्यात आले आहे़ नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, त्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
पुण्यातील प्रश्नांवर कालबद्ध काम करणार
By admin | Updated: January 17, 2015 23:36 IST