ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्वभाव धाडसी व सतत नवे काही करण्याचा होता. मातृभूमीवर, येथील माणसांवर त्यांचे कमालीचे प्रेम व विश्वास होता. राष्ट्रपती असतानाचे मिग विमानाचे उड्डाण, पाणबुडीतील प्रवास असे विक्रम त्यांच्या नावावर आहेतच. मात्र, कंदील व बॅटरीच्या प्रकाशात ऐजॉल विमानतळावरून दिल्लीला जाण्याचे त्यांनी केलेले धाडस हे भारतीय हवाईदलावर असलेल्या अपार विश्वासामुळेच ! डॉ. कलाम २००५ मध्ये मिझोरामला अधिकृत कार्यक्रमासाठी गेले असतानाचा हा प्रसंग.
डॉ. कलाम दुसऱ्या दिवशी परतणार असल्याने सायंकाळी काम आटोपल्यावर सगळे निवांत होते. पण, अचानक निर्णय बदलत डॉ. कलाम यांनी लगेचच दिल्लीला परतायचे ठरवले. अधिकाऱ्यांनी हवाईदल प्रमुखांना अशी कल्पना देताच रात्री येथून जाण्याची सुविधाच नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कलामांचे या उत्तराने समाधान झाले नाही.
ते म्हणाले, "युद्धप्रसंग वा आणीबाणी परिस्थितीत तातडीने जायचे असल्यास हवाईदल सकाळ होण्याची वाट पाहात बसणार काय? आत्ताच निघायचेय, आवश्यक ती तयारी करा." हवाई पट्टीवर दिवे नसल्याने रात्रीचे उड्डाण धोक्याचे होते. राष्ट्रपती हे तीनही दलांचे सेनापती असल्याने त्यांचा आदेश पाळणे आवश्यकच होते. अधिकाऱ्यांनी मनाचा हिय्या केला व मध्यरात्रीत उड्डाणाचा निर्णय घेतला. उपस्थित जवान, अधिकारी वर्गाने हातात बॅटरी, कंदील घेऊन धावपट्टीवर पुरेसा उजेड निर्माण केला. निर्णय धाडसी होता, मात्र त्या मिणमिणत्या प्रकाशातील धावपट्टी डॉ. अब्दुल कलामांना रोखू शकली नाही. दिल्लीत पोहोचताच कलाम यांनी त्या हवाईदल अधिकाऱ्यास दूरध्वनी करून बिकट परिस्थितीतून मार्ग काढल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
धाडसी स्वभावाला आत्मविश्वासाची जोड असल्यास अशक्य काहीच नाही, हे डॉ. कलाम यांनी दाखवून दिले.
- प्रसाद भडसावळे