डिंभे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सगुणा राईस तंत्रज्ञानाच्या धर्तीवर आंबेगाव तालुक्यात यंदा भात लागवडीवर भर देण्यात येणार आहे. आंबेगाव तालुका कृषी विभागामार्फत याचे विभागवाईज ध्येय निश्चित करण्यात आले असून प्रती कृषी सहायक ५ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत यंदाच्या सन २०१५-२०१६ च्या खरीप हंगामात जास्तीत जास्त भात उत्पादनासाठी नवनविन तंत्रज्ञाचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भात लागवडीसाठी सगुणा राईस तंत्र (एस.आर.टी) या पध्दतीचा वापर करून भात लागवड केली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील हे तंत्रज्ञान असून टोकणी पध्दतीने भाताची लागवड केली जाते. भात उत्पादक शेतकऱ्यांनी टोकणी पध्दतीने भात लागवड केल्यास भाताच्या सरासरी उत्पादनात निश्चित भर पडत असल्याचे आंबेगाव तालुका कृृषी अधिकारी संजय विश्वासराव यांनी सांगीतले. एस. आर. टी पध्दतीने भात लागवड करण्यासाठी कृषी विभागामार्फत नुकतेच भात उत्पादन क्षेत्र असणाऱ्या डिंभे विभागातील सुपेधर, गोहे, पोखरी, राजेवाडी, जांभोरी या गावांना भेटी देवून शेतकऱ्यांना ही पध्दत समजावून सांगितली. यावेळी आंबेगाव तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव, मंडल अधिकारी डी. एन. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बी. एस. इसकांडे, एस. व्ही. आवटे, चासकर, कृषी सहायक एस. पी. इंदोरे, एस. एन. बागडे इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)
नव्या तंत्रानुसार भात लागवड
By admin | Updated: July 1, 2015 23:43 IST