लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे पुरोगामी चळवळीचे विद्यापीठ आणि आधारस्तंभ होते. आयुष्यभर त्यांनी सांविधानिक मूल्यांची जपणूक केली. आज देशात सार्वत्रिक न्याय निर्माण होण्यासाठी नवसमाज घडायला हवा. याकरिता संविधानाच्या मूल्यावर चिंतन झाले पाहिजे. भविष्यात संविधान वाचवायचे तर सत्यशोधक चळवळ पुढे न्यावी लागेल,” असा सूर दिवंगत पी. बी. सावंत अभिवादन सभेत उमटला. कृतिशील पुरोगामी सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नसल्याबद्दल सामाजिक संघटनांनी खंत व्यक्त केली. सावंत यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यायला हवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संघटनांनी शनिवारी (दि.२०) बालगंधर्व रंगमंदिरात अभिवादन सभेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, तत्वज्ज्ञ विमल कीर्ती भानोत, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, निवृत्त पोलीस अधिकारी, हसन मुश्रीफ, पी. बी. सावंत यांचे पुत्र विश्वजित सावंत, ‘जमाल-ए-इस्लाम’चे अर्शद वारसी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी, सुभाष वारे, बी. डी. मोरे, मधुसूदन कांबळे, अनुपम सराफ, संजय लोहार, सज्जनकुमार, लता भिसे, सुरेश खोपडे, राजेंद्र गायकवाड, श्रीमंत कोकाटे, निरंजन जैन, युक्रांदचे संदीप बर्वे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी सावंत यांना यावेळी श्रद्धांजली वाहिली.
विश्वजित सावंत म्हणाले की, माणूस, माणुसकी, मानवी हक्क, पर्यावरण, शेती, अंधश्रद्धा, अर्थव्यवस्था, संविधान हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. पण त्या विषयांना अभ्यासपूर्ण मांडणीचे अधिष्ठान होते. एखाद्या विषयासंदर्भात अभ्यास नसताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या प्रवृत्तीचा त्यांना राग होता. यापुढील काळात त्यांच्या मतांचा गैरवापर न होणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
बुधाजीराव मुळीक यांनी सावंत यांच्या रायगड आंदोलनाचा अनुभव कथन केला. या आंदोलन प्रकरणात सावंत यांनी स्वत: जनहित याचिका तयार केली आणि त्यांच्यामुळे रायगडमधील पाऊण लाख हेक्टर जमीन उद्योजकाच्या हातात जाण्यापासून वाचली. सध्या शेती हा विषय गाजतोय. आज त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती, असेही ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------------------