पुष्प संशोधन संचालनालय, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावामध्ये फुल शेतीवर वैज्ञानिक- शेतकरी संवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ४० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते . डॉ संजय कड, वैज्ञानिक यांनी पुष्प संशोधन संचालनालय, पुणे यांच्या वतीने सर्व उपस्थित वैज्ञानिक व शेतकर्यांचे स्वागत केले व तसेच राष्ट्रीय शेतकरी दिनाचे महत्व विशद केले.
कार्यक्रम आयोजनाचा करण्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना झेंडू, ऍस्टर आणि शेवंती इत्यादी पिकांची वैज्ञानिक पद्धतीने लागवड करणे व विविध शेतकऱ्यांना फुलशेतांना भेट देणे हा होता. वाकी बुद्रुक गावातील शेतकरी रामदास हिरामण कड यांच्या शेताची पाहणी यावेळी करण्यात आली. पुष्प संशोधन संचालनालय, पुणे यामध्ये चालणारे फुल शेतीवरील संशोधन, नवनवीन वाण विकसित करणे व राष्ट्रीय स्तरावर फुल शेतीची सध्याची परिस्थिती याची सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. डॉ. गणेश कदम, वैज्ञानिक यांनी झेंडू, ऍस्टर आणि शेवंती फुल पिकांच्या वैज्ञानिक पद्धतीने लागवड कशी करावी त्याबरोबर मृदा आणि पोषक तत्वे व्यवस्थापन, फुलांच्या पिकांची काढणी आणि काढणी नंतरची प्रक्रिया व्यवस्थापन यासह विविध वैज्ञानिक शेती तंत्रांवर प्रकाश टाकला.
प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रशांत कवर यांनी अस्टर आणि झेंडू पिकांच्या वेगवेगळ्या जैव-तंत्रज्ञान व विविध प्रजाती याबद्दल माहिती दिली. तसेच डॉ. ज्ञानेश्वर फिरके, वरिष्ठ वैज्ञानिक यांनी झेंडू, ऍस्टर आणि इतर फुल पिकांच्या विविध प्रमुख कीटक कोणते व त्याचे व्यवस्थापन कसे करावे यावर भर दिला आणि फुल शेतीमध्ये एकीकृत कीड व्यवस्थापन कसे महत्वाचे आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगितले. तसेच या कार्यक्रमध्ये केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याबद्दल चर्चा करण्यात आली व महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी फुल शेतीमध्ये उदभवणाऱ्या समस्या व प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी फुल शेतीचे अनुभव व्यक्त केले. हा कार्यक्रम डॉ. के वि प्रसाद, संचालक पुष्प संशोधन संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.
फोटोओळ:-
वाकी बुद्रुक गावात शेतकरी दिन कार्यक्रम साठी उपस्थित सर्व मान्यवर.