लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात अनेक कोरोनाबाधित हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सोबतच अनेक खासगी रुग्णालयांना कोरोना केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक डॉक्टरांच्या पदव्या या खोट्या आहेत. असे असताना त्यांच्यामार्फत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांचे हित बघता या डॉक्टरांच्या पदव्यांची तपासणी करण्याची मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्यानुसार विशेष पथकाची स्थापना करून या डॉक्टरांच्या पदव्या तपासण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी ज्या खासगी रुग्णालयात सर्व सुविधा आहेत, त्यांना खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात निर्णय घेण्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्ह्यात सुविधा असणाऱ्या अशा काही खासगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयातून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात डिपॉझिट वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आल्या. या तक्रारींमुळे या रुग्णालयांची तसेच डॉक्टरांची पदवी आणि कागदपत्रे तपासण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.