पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने कॅशलेस पद्धतीने मिळकत कर भरण्यासाठी संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली आहे. यामध्ये डेबिट अथवा के्रडिट कार्डद्वारे मिळकत कर भरणाऱ्यांना दोन टक्के अधिकची सवलतदेखील देण्यात आली आहे. परंतु, आजही महापालिकेच्याच अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वाइप मशिनच उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ‘सुट्ट्या पैशाची चिंता कशाला, मिळकत कर भरा कॅशलेस, मिळकत कर भरण्यासाठी ई-वॉलेटचा वापर करा’ आदी विविध संदेश देऊन पुणेकरांना अधिकाधिक मिळकतकर कॅशलेस पद्धतीने भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या या आवाहनला प्रतिसाद देऊन नागरिक विविध क्षेत्रीय कार्यालय अथवा मिळकत भरणा केंद्रावर डेबिट अथवा के्रडिट कार्ड घेऊन कर भरण्यासाठी जातात; पण स्वाइप मशिनच नसल्याने अनेकांना हेलपाटा पडत आहे. त्यामुळे शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मिळकत कर भरणा केंद्रांवर त्वरित स्वाइप मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
महापालिकेची केवळ जाहिरातबाजी
By admin | Updated: April 29, 2017 04:20 IST