शिरूर : विकास करावाच लागेल. तो थांबवता येणार नाही; मात्र विकास करताना पर्यावरणविषयक काळजी घेतली, तरच ‘गो ग्रीन’ ही संकल्पना यशस्वी होऊ शकेल, असे मत लखनौ विद्यापीठाचे माजी व्हाईस चॅन्सेलर डॉ. एस. बी. निमसे यांनी येथे व्यक्त केले.महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गो ग्रीन या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. निमसे बोलत होते. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते हे अध्यक्षस्थानी होते. जोहान्सबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक व्ही. व्ही. श्रीनिवासू, लखनौ विद्यापीठाच्या प्राध्यापिका उषा वाजपेयी, परिषदेचे समन्वयक डॉ. बी. आर.नखोत, स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत धापटे यांच्यासह विविध विषयांत संशोधन करणारे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. निमसे म्हणाले, ‘‘गेल्या १५० वर्षांत तंत्रज्ञानात मोठा विकास झाला. याचा फायदा झाला तसेच तोटेही सहन करावे लागले. कळत नकळत पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. विशेषत: ऊर्जा हे विकासाचा मुख्य स्रोत आहे. यामुळे नैसर्गिक स्रोतांचा मात्र नाश होत गेला.’’ याकडे गांभीर्याने पाहताना नवीन तंत्रज्ञान वापरून ऊर्जेचे नवीन स्रोत कसे निर्माण होतील, यासाठी सतत नवीन प्रकारचे संशोधन झाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. निमसे यांनी व्यक्त केली. हा विषय सर्वांच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच त्याचे महत्त्व समजल्यास पर्यावरणाचे रक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहिते म्हणाले, की आपल्या जीवनात पाच ‘इ’ महत्त्वाचे आहेत. यात इकॉनॉमी, एनर्जी, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट व एन्व्हायर्नमेंट यांचा समावेश आहे. हे सर्व ‘इ’ महत्त्वाचे आहेत. मात्र ‘एन्व्हायर्नमेंट’ या ‘इ’चे खऱ्या अर्थाने संरक्षण, संवर्धन करणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांच्या व्यक्त केलेल्या मतानुसार या शतकाच्या अखेरपर्यंत तापमानात ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ऊर्जेचा ज्या पद्धतीने वापर होतो आहे, ते पाहता ही भीती खरी होण्याची शक्यता असून मोठी आपत्ती उद्भवू शकते. यासाठी आपण सर्वांनी आताच जागृत होणे गरजेचे असल्याचे मतही प्राचार्य डॉ. मोहिते यांनी व्यक्त केले.वाजपेयी म्हणाल्या, की जर आपण ग्रीन झालोत तरच आपण पुढच्या पिढीला ग्रीन वातावरण, पर्यावरणपूर्वक वातावरण देऊ शकू. चां.ता.बोरा महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पसचे त्यांनी कौतुक केले. प्रा. श्रीनिवासू म्हणाले, की आपण हरित बनलो तरच शाश्वत आर्थिक विकास झाला, असे म्हणता येईल. दरम्यान, दोन दिवसांत पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर्स स्पर्धेतील निकिता हरगुडे (प्रथम), संदीप देवीकर (द्वितीय), मिलिंद देशपांडे, शैलेश देशमुख (तृतीय), व्ही. श्रीदेवी (चतुर्थ); तोंडी स्पर्धेतील नेहा देसाई (प्रथम), जयश्री बंगाली (द्वितीय), भूषण भुसारे (तृतीय) या विद्यार्थ्यांना प्रशास्तपत्रक देऊन गौरविण्यात आले.स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत धापटे यांनी स्वागत केले. प्रा. एन. एम. धनगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. औटी यांनी आभार मानले.
पर्यावरणाची काळजी घेतली, तरच ‘गो ग्रीन’ यशस्वी
By admin | Updated: January 14, 2017 03:20 IST