भोर : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४ जुलैला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरून द्यावा लागणार आहे, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांनी सांगितले.आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ रोजी संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या ५०० जागांसाठी, तर ४८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील ८८ रिक्त जागा मिळून ११८ ग्रामपंचायतींच्या ५४८ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमाची नोटीस शनिवारी (दि. ४) प्रसिद्ध करण्यात आली. १३ ते २० जुलै या कालावधीत आॅनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २१ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २३ जुलैला अर्ज मागे घेणे व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ४ आॅगस्टला मतदान व ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरुन द्यावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंट घेऊन ती निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरुन देण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात एक हेल्पडेस्क (मदत केंद्र) सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी आॅनलाइन अर्ज भरुन देण्याची माहिती दिली जाणार असल्याचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान इच्छूकांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. या साठी मतदारांच्या भेटी गाठींना भेट घेण्यास सुरवात झाली आहे. (वार्ताहर)-------------तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ७ सदस्यांप्रमाणे ४६२, तर वेळू, नसरापूर व उत्रौली ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ९ सदस्यांप्रमाणे २७५, तर भोलावडे ग्रामपंचायतीचे ११ सदस्य असे एकूण ५०० जागा व पोटनिवडणूक लागलेल्या ४८ जागा अशी एकूण ५४८ जागांसाठी सदरची निवडणूक होत असल्याने आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरायला एकच गर्दी होणार आहे. १३ जुलैपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व कामकाज शिक्षक भवनाच्या इमारतीत होणार आहे.
इच्छुकांना भरावा लागणार आॅनलाइन अर्ज
By admin | Updated: July 6, 2015 04:31 IST